सातार्‍यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या प्रयत्नाने खळबळ

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या रिपब्लिकन सेनेने गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने चर्चेसाठी पुढे न आल्याचा आरोप करत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र आंदोलन छेडले.

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून गळफास घेण्याचा इशारा दिला, तर महिला आघाडीच्या पूजा बनसोडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात अंगावर इंधन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित महिला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.

संघटनेच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून विविध सात मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत प्रशासनाला यापूर्वी अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, मुदत संपूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.

घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी धावपळ उडाली. महसूल व पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर अक्षय कांबळे आणि पूजा बनसोडे यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्या मागण्यांवर लवकरच चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षकांचा एल्गार..! न्याय हक्कांसाठी सातार्‍यात हजारोंचा मोर्चा; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी; शाळा बंद ठेवून आंदोलन
पुढील बातमी
स्मार्ट मीटर ‘सक्ती मागे घ्या, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा; शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या महावितरण कार्यालयाला घेराव

संबंधित बातम्या