अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणी-महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांना ‘नो एन्ट्री’; 10 जुलैपर्यंत सर्व पर्यटनस्थळे बंद, आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा इशारा

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पाचगणी व महाबळेश्‍वर परिसरातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे 10 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पर्यटकांना आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार पाचगणीचे टेबललँड, महाबळेश्‍वरमधील आर्थर सीट, केट्स पॉइंट, एलिफंट्स हेड पॉइंट, विल्सन पॉइंट, सावित्री पॉइंट, लिंगमळा धबधबा, ऐतिहासिक प्रतापगड तसेच तापोळा परिसर पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत.

अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, भूस्खलन आणि अपघातांचा धोका वाढल्याने पर्यटकांनी घाटरस्त्यांवर वाहने उभी करू नयेत तसेच बंदी आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'गाव तिथे स्मशानभूमी' या संकल्पनेची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याचा निर्णय - ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातअतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची व्यापक पूर्वतयारी; 274 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, रस्ते-पूल बंद, एनडीआरएफ तैनात

संबंधित बातम्या