कोरोना काळात सर्व्हे करण्याच्या बहाण्याने टाकणाऱ्या आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

by Team Satara Today | published on : 08 July 2026


सातारा : कोरोना काळात सर्व्हे करण्याच्या बहाण्याने दरोडा टाकल्याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सप्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास रविवार पेठ, सातारा येथे घडली होती. याप्रकरणी फिर्यादी श्रीकांत विठोबा बिल्लमपल्ली (वय 69 वर्षे) यांच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यातील आरोपींमध्ये महेंद्र रामदास मारणे (वय 38), सोमनाथ अंकुश सातव (वय 31), युवराज उर्फ योगराज यशवंत शिंदे (वय 34), सौ. रुपाली दत्तात्रय टेमगिरे (वय 40) आणि गोविंद रामदास मारणे (वय 34, सर्व रा. पुणे जिल्हा) यांचा समावेश आहे. 

या सर्व आरोपींनी संगनमत करून एक पिस्तूल किंवा एअरगन, रबरी काडतूस, बेशुद्ध करण्यासाठी लागणारी क्लोरोफॉर्मची बाटली, हॅन्डग्लोज, डॉक्टरांचा पांढरा प्रन, वही, पेन आणि सिरम कंपनी लिहिलेला कागद असे साहित्य सोबत घेतले होते. ते सर्व जण मारुती सुझुकी इर्टिगा कारमधून पुण्याहून सातारा येथील रविवार पेठेतील यशोदीप अपार्टमेंटजवळ पोहोचले.

तिथे गोविंद मारणे हा रस्त्यावर टेहळणी करत थांबला, तर सोमनाथ सातव आणि युवराज शिंदे यांनी कोरोना सर्व्हे करण्याचा बहाणा करून फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला आणि माहिती घेऊ लागले. त्यांच्या मागोमाग महेंद्र मारणे आणि रुपाली टेमगिरे हे देखील घरात शिरले. त्यानंतर त्यांनी बिल्लमपल्ली यांना धक्का मारून सोफ्यावर बसवून त्यांचे तोंड व गळा दाबून त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून दरोडा टाकला होता.  

या गुन्ह्याचा तपास करून सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब एस. कदम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. शेटे यांच्या कोर्टात चालला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन मुके यांनी कामकाज पाहिले आणि खटल्यात एकूण 7 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी, सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले ग्राह्य धरून न्यायाधीश ए.एम. शेटे यांनी आज सर्व आरोपींना 3 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद भोगावी लागेल, तसेच दंडाच्या रकमेपैकी 10 हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार म्हणून पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव, अमित भरते आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मोटे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रिपब्लिकन सेनेचा साताऱ्यात आत्मदहनाचा इशारा; विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन तीव्र
पुढील बातमी
किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांच्या स्मारक उभारणीसाठी प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या