वाहन तपासणीत तरुणाकडून देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त; १ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एकास अटक

by Team Satara Today | published on : 08 July 2026


सातारा : यवतेश्वर परिसरात वाहन तपासणीदरम्यान एका २० वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस तसेच अन्य मुद्देमाल असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. श्रेयश दशरथ जाधव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ७) रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सातारा–कास मार्गावरील यवतेश्वरजवळ वाहन तपासणी सुरू असताना श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) हा होंडा अॅक्टिव्हा दुचाकीवर संशयास्पदरीत्या आढळून आला. 

तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यातून एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी देशी पिस्तूल, त्यावरील काळ्या रंगाचे फायबर बट कव्हर, के.एफ.७.६५ असे मार्किंग असलेले एक जिवंत काडतूस, विवो कंपनीचा व्ही२९ ५जी मोबाईल, अॅपल कंपनीचा आयफोन १५ आणि होंडा अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित निकम यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून श्रेयश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फोन परत न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण;सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात कोयत्याने हल्ल्यात तरुण जखमी; रिक्षा-कारसह घराचे नुकसान, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या