परळी खोऱ्यात पावसाचे थैमान सुरू; आलवडीत भुस्खलन; शेतीचे नुकसान, भात शेतीत पाणी साचल्याने भात रोपे कुजु लागली

by Team Satara Today | published on : 08 July 2026


सातारा : परळी खोऱ्यात पावसाचे थैमान सुरू असून अतिवृष्टीमुळे काही गावातील एसटी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अलवडी येथे भूस्खलन झाल्यामुळे डोंगराचा भाग गावातील शेतीवर कोसळला आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. शिंदेवाडी येथे विद्युत पोल पडले आहेत.

परळी खोऱ्यातील पाटेघर डोंगराच्या वरती वसलेल्या आलवडी येथे मंदिराच्या वरच्या बाजूस डोंगराचा भाग खचला. त्यामुळे मातीचे ढिगारे व पाण्याचा प्रवाह गावात येऊन भात शेतीचे तसेच रस्त्याचे नुकसान झाले आहे. येथील विद्युत पुरवठाही गेल्या दोन दिवसांपासून खंडित होत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गावातील काही घरांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी उपळे फुटले आहेत. त्यामुळे घरांचे व गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. निगुडमाळ, नित्रळ या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाणी भात शेतीत साचल्याने भात रोपे कुजु लागली आहेत. रोपांपेक्षा पाणी जास्त असल्याने रोपे जमिनीत गाडली जाऊ लागली आहेत. अशीच परिस्थिती सांडवली, पांगारे, कुस बुद्रुक, बनघर खडगाव अशा गावांमध्ये होऊ लागली आहे.

शिंदेवाडी गावात जात असताना असलेल्या वळणावर झाड लाईटच्या खांबावर पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून या ठिकाणी चे झाड उद्योजक संतोषदादा भोसले यांनी जेसीबी मशीन पाठवून हटवले. या ठिकाणच्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रोहोट पाटेघर केळवली रस्त्यावर मोठ-मोठी दगडे, मातीचा ढिगारा वाहून येत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. ठोसेघर पठारावरील चिखली जांभे या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने एसटीच्या फेरा बंद असल्याने या गावाची वाहतूक व्यवस्था ठप्प आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यात मोठी दुर्घटना; खामगाव येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
पुढील बातमी
शिवतीर्थ विद्रुपीकरणाविरोधात सामाजिक सुशांत मोरे यांचे रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन; शिवतीर्थाचे पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू

संबंधित बातम्या