साताऱ्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 07 July 2026


सातारा : महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे सातारा शहरात उभारण्यात यावेत, अशी मागणी महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले पुतळा समिती, सातारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जन्म व कर्मभूमी सातारा जिल्हा असून त्यांनी आयुष्यभर गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी तसेच शिक्षणाच्या प्रसारासाठी मोलाचे कार्य केले. समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अन्यायकारक परंपरांविरोधात त्यांनी लढा दिला. महिलांच्या आणि वंचित घटकांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा सुरू करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली.

समितीने निवेदनात नमूद केले आहे की, सातारा शहरात अनेक समाजसुधारक, महापुरुष आणि लोकप्रतिनिधींचे पुतळे आहेत. मात्र, सातारा जिल्ह्याशी नाळ जुळलेल्या फुले दाम्पत्याचे जन्मस्थळ वगळता जिल्हास्तरावर पूर्णाकृती पुतळे नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

समाजातील सर्व घटकांना फुले दाम्पत्याच्या कार्याची सातत्याने प्रेरणा मिळावी आणि पुढील पिढीसमोर त्यांचा आदर्श कायम राहावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सातारा पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत किंवा पोवई नाका या ठिकाणांपैकी शासकीय जागेची निवड करून जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन पूर्णाकृती पुतळे उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर समितीचे अध्यक्ष सतीश (शंकर दत्तात्रय) शिंदे यांच्यासह डॉ. दत्ताजीराव जाधव, प्रकाश गोरे, रामभाऊ गोरे, संतोष बोराडे, सुरज शिंदे, अमोल जाधव, सतीश सुतार, विनोद जाधव, गुणवंत यादव, रामचंद्र, विकास कदम, अरुण यादव, उत्तम भोसले, अमोल वाघ, प्रकाश खटावकर, हेमंत शेलार, किरण भुजबळ, वैभव गवळी, मनोज जंगम, तेजस जगताप, किसन गोटे, उमेश गोरे, नवनाथ फिरके, निवेश यादव, अनिल किन, कृषिलेरा मोटे, आदित्य जाधव, क्रांतिक गोधे, हर्षवर्धन जंगम, हरीश जाधव, समाधान मावरे, संजय भिकू गायकवाड, कमलेश भुरे, पराग शिरसाट, विनय संपत उदय, अमित क्षीरसागर आणि निखिल चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

समितीने जिल्हा प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य ठिकाणी महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट ऑनलाईन पेमेंटप्रकरणी सराईत आरोपी जेरबंद, 12 गुन्हे उघड; विविध जिल्ह्यांसह परराज्यातील फसवणुकींची कबुली; 23.45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुढील बातमी
प्राथमिक शिक्षक संघटनांचे ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन

संबंधित बातम्या