सातारा : ऑनलाईन बँक व्यवहार झाल्याचे बनावट स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर वस्तू लंपास करणार्या एका सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली. तपासादरम्यान आरोपीने राज्यातील विविध ठिकाणी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर एकूण 12 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून 23 लाख 45 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आदित्य विनोद गायकवाड (वय 22, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
27 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सातार्यातील पोवई नाका परिसरातील एस.एस. मोबाईल शॉपमधून आरोपीने सॅमसंग फोल्ड-7 मोबाईल खरेदी केला. मोबाईलचे ऑनलाईन पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवून त्याने सुमारे 1 लाख 75 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पलायन केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईलही जप्त करण्यात आला.
सखोल चौकशीत आरोपीने सातारा, सांगली, पुणे, रायगड आणि गोवा येथेही याच पद्धतीने फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार शाहूपुरी (सातारा), कासेगाव (सांगली), तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, आळेफाटा, खोपोली आणि मडगाव (गोवा) आदी ठिकाणांतील एकूण 12 गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीकडून सोने, महागडे मोबाईल, टीव्ही, एसी, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा एकूण 23.45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, अशाच प्रकारे बनावट स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा शहर पोलीस ठाणे (फोन : 02162-230580) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि डी.बी. पथकातील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी पार पाडली.