तापोळा : महाबळेश्वर-तापोळा मार्गावर झोळाची खिंड येथे मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने मार्ग पूर्णतः बंद झाला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेना नेते सुभाष कारंडे यांनी ऐनवेळी स्वतःचा जेसीबी आणून रस्ता मोकळा केल्याने रस्ता खुला होवून अडकलेल्या नागरिकांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाने दरड कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे तेटली मुक्काम आणि येरणे मुक्काम या एसटी बस अनेक खासगी वाहने दोन्ही बाजूंना अडकून पडली. अनेक प्रवाशांना अनेक तास रस्त्यावरच थांबावे लागले. बसमधील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. रात्रीपर्यंत वाहतूक सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरणात निर्माण झाले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाला याबाबत तातडीने माहिती दिली. मात्र, बराच वेळ कोणतीही यंत्रणा किंवा अवजड यंत्रसामग्री घटनास्थळी न पोहोचल्याने रस्ता मोकळा करण्यास विलंब झाला. परिणामी, प्रवाशांचे हाल अधिकच वाढले.
अखेर शिवसेना नेते सुभाष कारंडे यांनी स्वतः पुढाकार घेत रात्री सुमारे अकरा वाजता झोळाची खिंड येथे पोहोचून मुसळधार पावसात जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू केले. प्रतिकूल हवामानातही ते घटनास्थळी ठामपणे उभे राहून कामावर लक्ष ठेवत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे दरड हटविण्यात यश आले आणि बंद झालेला महाबळेश्वर–तापोळा मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर अडकलेल्या एसटी बससह सर्व वाहनांना मार्गस्थ होता आले आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.