सातारा : महाबळेश्वरमध्ये गेल्या शंभर वर्षांतील विक्रमी तब्बल 11 इंच (286 मिमी) पावसाची नोंद झाली असून सातारा जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 52.7 मिमी पाऊस पडला असून, दरडी कोसळणे, घरांची पडझड, रस्ते बंद होणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाचा तातडीचा आढावा घेतला आणि एनडीआरएफसह सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि जावळी या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर या अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली असून फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात दगड वाहनावर कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाटण, सातारा आणि खंडाळा तालुक्यांत मिळून 24 घरांची पडझड झाली असून, खंडाळा तालुक्यात दोन शेळ्यांचाही मृत्यू झाला आहे. मेढा-पाचगणी मार्गावरील केळकर घाटात दरड कोसळल्याने आणि पाटण तालुक्यातील नारळवाडी येथे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील अकरावाडी येथील 17 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच सडा वाघापूर, ओझर्डे, लिंगमळा, ठोसेघर आणि एलफिन्स्टन पॉइंट परिसरात चिखल आणि घसरडे रस्ते निर्माण झाल्याने पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
सातारा शहरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे राजवाडा, पोवई नाका आणि भाजी मंडई परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून व्यापारी आणि शेतकर्यांना याचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, बाजारपेठेत रेनकोट, छत्र्या आणि छत्री दुरुस्तीच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. परिसरातील धबधबे दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढत असला, तरी प्रशासनाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 48 तासांत 4.11 टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.