मर्ढे येथे पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला नवजीवन; पोलीस, होमगार्ड आणि ग्रामस्थांच्या धाडसी बचावामुळे जीव वाचला

by Team Satara Today | published on : 06 July 2026


सातारा : सातारा तालुक्यातील मर्ढे येथे कृष्णा नदीला आलेल्या पुरादरम्यान घडलेल्या थरारक घटनेत पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा पोलीस, होमगार्ड आणि ग्रामस्थांच्या संयुक्त धाडसी प्रयत्नांमुळे जीव वाचला. वेळेवर केलेल्या बचावकार्यातून मोठी दुर्घटना टळली.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून मर्ढे-आनेवाडी जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. या परिसरात फिरत असताना शिवाजी शिंगटे (रा. मर्ढे) यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे व किरण खवले यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. यावेळी सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही धाडसाने मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे नदीबाहेर काढण्यात यश आले.

या घटनेनंतर प्रशासनाने मर्ढे पुल परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून धोकादायक ठिकाणी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा, पाण्यात उतरण्याचा किंवा सेल्फी काढण्याचा मोह टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता सर्व यंत्रणा सतर्क आहेत. बचावकार्यात सहभागी झालेल्या पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या धाडसामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इलेक्ट्रिक पोलवरील तारा चोरणारी टोळी गजाआड; सातारा एलसीबी आणि पुसेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई; 11 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पुढील बातमी
महाबळेश्‍वरात शतकातील विक्रमी 11 इंच पाऊस; सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर; प्रशासन हाय अलर्टवर

संबंधित बातम्या