इलेक्ट्रिक पोलवरील तारा चोरणारी टोळी गजाआड; सातारा एलसीबी आणि पुसेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई; 11 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

by Team Satara Today | published on : 06 July 2026


पुसेगाव : पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलवरील अल्युमिनियमच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या वारंवार घडणार्‍या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके व पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांच्या पथकांनी चोरी झालेल्या विविध घटनास्थळांना भेटी देऊन सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारांना सतर्क केले तसेच सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून माहिती गोळा केली. या तपासादरम्यान खटाव तालुक्यातील सुरेश बबन जाधव (वय 23), दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (वय 26), आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने आणि बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने या चौघांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून ते लपून बसलेल्या ठिकाणी सापळा लावला आणि अत्यंत शिताफीने या चारही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गेल्या सहा महिन्यांत संगणमत करून पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वेगवेगळ्या ठिकाणी पोलवरील अल्युमिनियमच्या तारा चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून बाजारभावाप्रमाणे 5,43,600 रुपये किमतीच्या एकूण 1208 किलो वजनाच्या अल्युमिनियमच्या तारा आणि चोरीसाठी वापरलेली 6,00,000 रुपये किमतीची महिंद्रा मॅक्स पिकअप जीप असा एकूण 11,43,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके, पुसेगावचे प्रभारी स.पो.नि. नागनाथ खुणे, स.पो.नि. रोहित फार्णे, पो.उ.नि. पारितोष दातीर यांच्यासह एलसीबी आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी मोलाची कामगिरी बजावली. या धडक कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विशेष पुढाकार; आषाढी वारीसाठी रस्ते दुरुस्ती, टोलमाफी आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर
पुढील बातमी
मर्ढे येथे पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला नवजीवन; पोलीस, होमगार्ड आणि ग्रामस्थांच्या धाडसी बचावामुळे जीव वाचला

संबंधित बातम्या