सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि वाई या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागानेही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.