सातारा : सातारा जिल्ह्यात मान्सूनने गेल्या २४ तासांत सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू मोसमातील एकूण पाऊस ८४ मिलीमीटर झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना, पूर्वेकडील काही तालुक्यांमध्ये तुलनेने कमी पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक १६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पाऊस ४२७.९ मिलीमीटर झाला आहे. त्यापाठोपाठ जावली (मेढा) येथे ८१.२ मि.मी., वाई येथे ६८.७ मि.मी. आणि पाटणमध्ये ६३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पश्चिम भागातील नद्या, ओढे आणि धबधबे पुन्हा प्रवाही झाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मध्य आणि उत्तर भागातही समाधानकारक पाऊस झाला आहे. खंडाळा येथे ४९.५ मि.मी., कराडमध्ये ४३.२ मि.मी., सातारा शहरात ४१.५ मि.मी. आणि कोरेगावमध्ये ३२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर अद्याप कमीच आहे. खटाव (वडूज) येथे २१.५ मि.मी., फलटणमध्ये १८.८ मि.मी., तर माण (दहिवडी) येथे केवळ ६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी आणखी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात विशेषतः घाटमाथा आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील जलसाठ्यांमध्ये वाढ होत असून खरीप हंगामासाठी ही समाधानकारक बाब मानली जात आहे.