सातारा : परळी खोऱ्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसासह सुटलेल्या वादळी वाऱ्याने कारी गावातील जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने पावसाचे पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये शिरले. परिणामी शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य, फर्निचर आणि अन्य शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. संबंधित विभागाकडून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली असून नुकसानग्रस्त शाळेची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच शैक्षणिक कामकाज पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे शाळेच्या काही भिंतींनाही तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने शाळेत विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि जुन्या इमारतींना तडे जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि खराब हवामानात अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.