गंभीर दुखापत प्रकरणातील तिघांना शिरवळ येथून अटक; शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

by Team Satara Today | published on : 05 July 2026


सातारा : शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासातील वेग आणि तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण घालत गंभीर दुखापत प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शिरवळ येथून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

साहिल प्रीतम कांबळे (वय 18, रा. भोसले कॉलनी, रामकुंड, सदरबझार, सातारा), शुभम संतोष काकडे (वय 20, रा. वडुथ, ता. जि. सातारा) आणि सुशांत अर्जुन काळे (वय 18, रा. पाठखळ, ता. जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने फिर्यादीकडून घटनेची सविस्तर माहिती घेत घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यासोबतच तांत्रिक विश्‍लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत आरोपींचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी शिरवळ परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. शिरवळ एसटी स्थानक परिसरात संशयित फिरत असल्याचे दिसून येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र गोवेकर करीत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे आणि पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावर बोरगाव गावच्या हद्दीतअपघातप्रकरणी भोरच्या कारचालकावर गुन्हा; अपघातात एकाचा मृत्यू आणि एक जखमी
पुढील बातमी
अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या