ठोसेघर येथील नववीतील विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन

by Team Satara Today | published on : 05 July 2026


परळी : ठोसेघर (ता. सातारा) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वप्निल नामदेव आवकीरकर (वय १४) याचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. स्वप्निलच्या पश्चात वडील नामदेव आवकीरकर, आई सुनीता आवकीरकर आणि भाऊ श्रेयस आवकीरकर असा परिवार आहे.

शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला असता त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ ठोसेघर येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जि.प.चे उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन वैद्यकीय उपचाराबाबत सूचना केल्या. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले; मात्र सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि स्वप्निलची प्राणज्योत मालवली.

स्वप्निल हा आदर्श माध्यमिक विद्यालय, ठोसेघर येथे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. तो अभ्यासू, शांत, नम्र आणि होतकरू विद्यार्थी म्हणून शिक्षक व मित्रपरिवारात परिचित होता. शिक्षणाची आवड असल्याने तो दररोज आपला भाऊ श्रेयस आवकीरकर याच्यासोबत सकाळी साताऱ्यात क्लासला जात असे. सकाळी ७ ते ९ या वेळेत क्लास पूर्ण करून राजवाडा येथून सकाळी ९.३० वाजताच्या बसने ठोसेघरला परत येत असे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता विद्यालयात नियमित जात होता. शनिवारीही तो क्लासला जाण्याच्या तयारीत होता; मात्र नियतीने त्याच्यावर काळाचा घाला घातला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मेढा–बामणोली मार्गावर दरडी कोसळत असल्याने दगड-माती थेट रस्त्यावर; रस्ता रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्ण
पुढील बातमी
महाबळेश्‍वर-शिरूर मार्गाचा पहिला टप्पा वर्षात पूर्ण करणार : विधानपरिषदेत ना. शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती

संबंधित बातम्या