परळी खोऱ्यातील बिबट्याचा न्युमोनियाने मृत्यू; वन्यजीवांमधील संसर्गजन्य आजारांचा धोका पुन्हा अधोरेखित

by Team Satara Today | published on : 04 July 2026


सातारा : परळी खोऱ्यातील कातवडी-नित्रळ (ता. सातारा) मार्गावर शुक्रवारी अस्वस्थ अवस्थेत फिरताना आढळलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रक्त तपासणीच्या अहवालातून त्याला गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. सुमारे महिनाभरापासून तापाने तो त्रस्त असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, प्रकृती अधिकच खालावल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

शुक्रवारी (दि. ३) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कातवडी-नित्रळ मार्गावर एक बिबट्या अस्वस्थ अवस्थेत फिरत असल्याची माहिती सातारा वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडून कराड तालुक्यातील वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल केले.

उपचारादरम्यान करण्यात आलेल्या रक्त तपासणीमध्ये बिबट्याला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. सुमारे अडीच वर्षांचा पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या गेल्या महिनाभरापासून तापाने त्रस्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. न्यूमोनियामुळे त्याच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाल्याने प्रकृती चिंताजनक बनली आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर आवश्यक वैद्यकीय व वन विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्राच्या स्मशानभूमीत बिबट्याचे दहन करण्यात आले. या घटनेमुळे वन्यजीवांमधील संसर्गजन्य आजारांचा धोका पुन्हा अधोरेखित झाला असून, अशा प्रकारे आजारी किंवा जखमी वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगम माहुलीत ३०७ वा 'शौर्य आगमन दिवस' उत्साहात साजरा; महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन; इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती
पुढील बातमी
बलात्कार प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने सुनावली २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

संबंधित बातम्या