बनावट सोन्याच्या बांगड्या तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद; तीनजणांना अटक; 10 लाख 35 हजारांचे तीन गुन्हे उघड

by Team Satara Today | published on : 04 July 2026


सातारा : सातारा शहरात हॉलमार्क असलेल्या बनावट पिवळ्या धातूच्या बांगड्या खर्‍या सोन्याच्या भासवून सराफ व्यावसायिक तसेच फायनान्स आणि बँक कंपन्यांची मोठी आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाला यश आले आहे.

या आरोपींनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल 10 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी उमेश शशिकांत शिंदे वय 40, मूळ रा. कोरेगाव, जि. सातारा सध्या रा. चिंतामणी सोसायटी जोशी मार्ग पोतदार मिलजवळ मुंबई, सोमनाथ भुजंगराव बाबर वय 39, सध्या रा.महाडीक कॉलनी देगाव रोड सातारा मुळ रा. मु. पो. साबळेवाडी ता. जि. सातारा आणि सिंकदर बादशहा शेख वय 48 रा. मु. शांतीनगर पाचगाव पो.पाचगाव ता. करविर, जि. कोल्हापुर. यांना अटक केली असून, या टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध सातारा शहर पोलिसांचे डी.बी. पथक घेत आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून हे आरोपी परागंदा झाले होते. मात्र, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सायबर पोलीस ठाण्याचा स्टाफ आणि डी.बी. पथकातील कर्मचार्‍यांनी तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने अत्यंत जलद गतीने तपास चक्र फिरवून आरोपींना परजिल्ह्यातून बेड्या ठोकल्या.

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहर पोलिसांकडून जिल्ह्यातील सर्व बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि सराफ व्यावसायिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. सोने तारण ठेवताना किंवा त्याची खरेदी-विक्री करताना केवळ हॉलमार्कवर विसंबून न राहता, अधिकृत यंत्रणेमार्फत आणि तज्ज्ञांकडून दागिन्यांची कसून तपासणी व सत्यता पडताळल्याशिवाय कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी त्वरित सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. हवा. निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो. ना. पंकज मोहिते, पो. कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम, सचिन आदमाने तसेच सायबर पोलीस ठाण्यातील स्टाफने सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण विस्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली
पुढील बातमी
संगम माहुलीत ३०७ वा 'शौर्य आगमन दिवस' उत्साहात साजरा; महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन; इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती

संबंधित बातम्या