सातारा : साताऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण विस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या अत्यंत भीषण स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ६ च्या सुमारास मंगळवार पेठ, पॉवरहाऊस, यवतेश्वर घाटरस्ता पायथ्याला असलेल्या संत कबीर सोसायटीमध्ये बंद घरात झालेल्या सिलेंडर विस्फोटामुळे घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आजूबाजूच्या परिसरातही याचे हादरे जाणवले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. गॅस गळतीमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली असली, तरी सर्व नागरिक सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीस आणि संबंधित विभाग या घटनेचा अधिक तपास करत आहेत.