ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर येथे लवकर कॅन्सर निदान विषयीची कार्यशाळा उत्साहात; इंडियन कॅन्सर सोसायटी, टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांचा संयुक्त विद्यमाने आयोजन

by Team Satara Today | published on : 04 July 2026


सातारा : प्राथमिक आरोग्यसेवा देणाऱ्या तज्ज्ञांचे कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध याबाबतचे ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर येथे दोन दिवसीय कॅन्सर जनजागृती आणि लवकर निदान कार्यशाळा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेला ४०जनरल प्रॅक्टिशनर्स (GPs) आणि महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, रायगाव येथील १५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामान्य कर्करोगांविषयी जनजागृती वाढवणे आणि वेळेवर निदानाला चालना देणे यासाठी ही कार्यशाळा एक प्रभावी व्यासपीठ ठरली.

ही कार्यशाळा टाटा हॉस्पिटल (ACTREC) येथील तज्ज्ञांच्या मान्यवर पॅनेलद्वारे घेण्यात आली. यामध्ये डॉ. गीतांजली अमीन, डॉ. वेदावती बंडुपाध्याय, डॉ. स्वाती अय्यर, डॉ. सुहासिनी तिरलोटकर, मिस अंजली साळवे आणि सौ. सरगम जाधव (प्रतिनिधी, इंडीयन कॅन्सर सोसायटी ) यांचा समावेश होता. तसेच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर येथील टीमनेही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

दोन दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागींच्या तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग यांच्या लवकर निदान व तपासणीबाबत सखोल आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सत्रांमध्ये सुरुवातीची लक्षणे, जोखीम घटक, तपासणीच्या पद्धती, रुग्ण समुपदेशन तसेच पुढील तपासणी आणि उपचारांसाठी वेळेवर संदर्भ देण्याचे महत्त्व यावर भर देण्यात आला. संवादात्मक चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिकांमुळे सहभागींची वैद्यकीय कौशल्ये अधिक बळकट झाली आणि संशयित कर्करोग रुग्णांची लवकर ओळख पटविण्याबाबत आत्मविश्वास वाढला.

या कार्यशाळेत जनरल प्रॅक्टिशनर्स आणि आरोग्यविषयक विद्यार्थ्यांची समुदायात जनजागृती निर्माण करणे, नियमित कर्करोग तपासणीस प्रोत्साहन देणे आणि लवकर निदान सुलभ करणे यामधील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली. कर्करोगाचे लवकर निदान केल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळतात, कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी होतात आणि रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा होते.

कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आयोजकांनी सर्व तज्ज्ञ प्राध्यापक, सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरची कर्करोग जनजागृती, लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा याबाबतची बांधिलकी अधिक दृढ होते, तसेच निरोगी समाजनिर्मितीस हातभार लागतो.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माहिती अधिकारातील बदल रद्द न झाल्यास पुन्हा जनआंदोलन उभारावे लागेल; अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा
पुढील बातमी
साताऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण विस्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

संबंधित बातम्या