पाटण : तारळे नदीवरील नवीन पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे नदी पाणीपात्रात वाढ झाल्यामुळे अपूर्ण पुलालगत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे कोंजवडे, काटेवाडी, कडवे, कडवे खुर्द, सावरघर, नुने, महाडिकवाडी, जाधववाडी, दुटाळवाडी आणि सासपडे या गावांचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटला आहे.
तारळे नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मे महिना उलटूनही पुलाचे काम पूर्ण झाले नाही. कामातील संथ गती, नियोजनाचा अभाव आणि संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना तात्पुरत्या पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे. पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. तात्पुरत्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने तत्काळ वाहतूक बंद केली.
मात्र, ही परिस्थिती प्रशासन आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. वेळेत पुलाचे काम पूर्ण झाले असते, तर तात्पुरत्या पुलाचा वापर करण्याची वेळ आली नसती आणि गावांचा संपर्कही तुटला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
वाहतूक बंद झाल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णांना रुग्णालयात नेणे, दूध व शेतीमालाची वाहतूक, तसेच अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना मोठा फेरा मारावा लागत असून, अनेक ठिकाणी तोही शक्य होत नाही.