टीईटी परीक्षा आता ऑनलाइनच; आयबीपीएसला लवकर परीक्षा घेण्याचे परीक्षा परिषदेचे आयबीपीएस कंपनीला निर्देश

by Team Satara Today | published on : 04 July 2026


पुणे: राज्य परीक्षा परिषदेकडून २८ जूनला घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परिक्षा रद्द करण्यात आली होती. संबंधित परीक्षा आता ऑनलाइनच घेण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला असून, परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे निर्देश आयबीपीएस या कंपनीला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी आयबीपीएस कंपनीच्या व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ चे आयोजन दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेपर क्र. १ साठी एकूण २ लाख ५८ हजार ६१ व पेपर क्र. २ साठी ३ लाख ४२ हजार ६४ असे एकूण ६ लाख १२५ परीक्षार्थींनी परीक्षेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते.

परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ७२९ परीक्षा केंद्र निश्चित केले होते. परीक्षा केंद्रांवर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, २८ जूनला होणारी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. यापूर्वी संबंधित परीक्षेचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी आयबीपीएस कंपनीला परीक्षा परिषदेने कळविले आहे. त्यातच १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र. १३८५/२०२५ तसेच अन्य संबंधित याचिकांवर दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी २०२८ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान दोनदा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाइन कार्यपद्धतीचा अवलंब करून घ्यायच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरीत्या व पारदर्शकपणे करावे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे होणारी टीईटी परिक्षा आता ऑनलाइनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०२३ पासून पाठपुरावा

राज्य परीक्षा परिषद संबंधित टीईटी परिक्षा ऑनलाइन घ्यावी, यासाठी आयबीपीएस कंपनीकडे २०२३ पासून पाठपुरावा करत आहे. परंतु, गेल्या तीन वर्षात संबंधित परीक्षा ऑफलाइनच घेण्यात आली होती. आता अखेर ही परीक्षा ऑनलाइन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर वाढला; घाटमाथ्यावर पावसाची संततधार कायम
पुढील बातमी
जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार: ललित गांधी, महामंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित बातम्या