सातारा : सातारा- नित्रळ मार्गावरील काळेश्वरी घाटात शुक्रवारी सकाळी साडेदहा सुमारास रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा बिबट्या दिसल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
बिबट्या रस्त्यालगत जखमी अवस्थेत पडून होता. तो अधूनमधून हालचाल करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी मोबाईलवर छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीत करण्यासाठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी भर पावसात तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन उपचारासाठी हलविण्याच्या दृष्टीने आवश्यक हालचाली सुरू करण्यात आल्या. बिबट्याच्या प्रकृतीचे नेमके कारण याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, सातारा परिसरातील घाटरस्त्यांवर बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा वाढता वावर वारंवार समोर येत आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींसाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संवेदनशील भागांत सूचना फलक, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि वन्यजीव संरक्षणाच्या प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सातारा संदीप अनिल जोपळे, वनपाल परळी आनंदा सावंत, वनपाल रोहोट प्रकाश शिंदे, वनरक्षक पळसावडे संभाजी दहिफळे, वनरक्षक ठोसेघर सोमनाथ कुडळ, वनरक्षक खडगाव हनमंत निकम, वनरक्षक धावली तुषार लगड, कायम वनमजुर राजेंद्र पवार, ग्रामस्थ सुधिर जीमन, संदीप पिंगळे, रतन लोटेकर, शेखर चव्हाण मयुर गुजर यांनी सहभाग घेऊन वन्यप्राणी बिबट यांस सुरक्षित रेस्क्यू केला आहे.