महाबळेश्वर : महाबळेश्वर - पोलादपूर मुख्य राज्यमार्गाला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पावसामुळे दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरूच आहे. मागील तीन दिवसांत सलग दोनदा दगड-मातीचा मलबा घाटरस्त्यावर आल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास पोलादपूर हद्दीत मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. यानंतर रस्ते कामासाठी घाटरस्त्यावर असलेल्या जेसीबी पोकलेनच्या मदतीने हा मलबा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पावसाळ्याला सुरुवात होताच आंबेनळी घाट पुन्हा एकदा धोक्याच्या छायेत आला आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. गुरुवारी पुन्हा एकदा पोलादपूर हद्दीतील घाट परिसरात मातीचा ढिगारा रस्त्यावर आला.
गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रानकडसरी, दाभिल टोक तसेच घाटातील इतर काही दरडप्रवण भागांमध्ये मातीचे ढिगारे खाली आल्याचे दिसून आले. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ही घटना समजताच काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली माती हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले.