शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. मनोजदादा आक्रमक; कृषी सौर कनेक्शन वेळेत देण्याची विधानसभेत जोरदार मागणी

by Team Satara Today | published on : 03 July 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंपाच्या प्रश्नावर कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विधानसभेत आक्रमक होत शासनाचे लक्ष वेधले. औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडत कंपन्यांच्या हलगर्जीपणावर जोरदार हल्ला चढवला.

आमदार घोरपडे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज मिळावी म्हणून सौर पंपाची योजना राबवली. माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार कागदपत्रांची पूर्तता केली. लाखो रुपये खर्चून शेतात पाईपलाईनची कामे पूर्ण केली. सोलर कनेक्शनसाठी डिपॉझिट देखील भरले.

शासनाच्या नियमाप्रमाणे ६० दिवसांत सोलर कनेक्शन देणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र नियुक्त कंपन्यांकडून दोन दोन वर्षे होऊनही पंप बसवलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाअभावी पीक घेता येत नाही. उत्पादन घटले आहे. बँकेचे हप्ते थकले आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत जात आहे, अशी खंत आमदार घोरपडे यांनी व्यक्त केली.

ज्या शेतकऱ्यांनी सर्व अटींची पूर्तता करूनही विलंब करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करा. पात्र शेतकऱ्यांना ३० दिवसांच्या आत प्राधान्याने सोलर पंप बसवून द्या. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार मनोज घोरपडे यांनी केली. दरम्यान, आ. मनोजदादा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक असतात. आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आमदार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगड
पुढील बातमी
आंबेनळी घाटात पावसामुळे दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरूच; घाट पुन्हा एकदा धोक्याच्या छायेत

संबंधित बातम्या