सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; पाटण परिसरात संततधार, महाबळेश्वरात ७० मिमी, कोयना धरणातील उपयुक्त साठा ९.३९ टीएमसीवर

by Team Satara Today | published on : 03 July 2026


सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, घाटमाथ्यासह महाबळेश्वर, नवजा, कोयनानगर आणि पाटण परिसरात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासांत ७० मिमी पावसाची नोंद झाली असून, कोयना धरणातील पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज ते रेड अलर्ट जारी केला आहे

गेल्या २४ तासांत महाबळेश्वर येथे ७० मिमी, नवजा येथे ४१ मिमी, तर कोयनानगर येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली. पाटण तालुक्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, मान्सूनच्या सुरुवातीला पाथरपुंज येथे १७४ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली होती.

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठा वाढून ९.३९ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. २३ जून रोजी हा साठा ८.६३ टीएमसी होता. सध्या धरणात सुमारे २,२५० क्युसेक पाण्याची आवक सुरू असून जलसंपदा विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, महाबळेश्वर–वाई मार्गावरील पसरणी घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. प्रशासनाने तातडीने यंत्रणा राबवून दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सततच्या पावसामुळे वेण्णा नदीसह जिल्ह्यातील अनेक नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसामुळे ठोसेघर, भांबवली, ओझर्डे तसेच इतर धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, घाटमाथा भागात दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील बातमी
वाढे फाटा येथे सराईत मोटारसायकल चोर जेरबंद; चोरीच्या चार दुचाकी सातारा शहर पोलिसांकडून हस्तगत

संबंधित बातम्या