सातारा : पात्र मतदारांची मतदार यादीत नोंदणी व्हावी आणि कोणत्याही अपात्र नावाचा समावेश होऊ नये या उद्दिष्टाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांनी तात्काळ पुनरिक्षण कामाला सुरुवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी 3 हजार 500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम हे राष्ट्रीय काम आहे. त्यामुळे या कामाला प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागातील या कामासाठी गट विकास अधिकारी लक्ष केंद्रीत करावे. ज्या शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली अशा शिक्षकांना या कामासाठी सुट द्यावी. त्यांचे काम शाळेतील इतर शिक्षकांनी करावे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गृह भेटीदरम्यान कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करावी, असे सांगून या कामाला प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.