सातारा नगरवाचनालयाच्या पाठक सभागृहाचे दर वाढले; सांस्कृतिक व साहित्यिक वर्तुळात चर्चा

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : सातारा येथील श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाने आपल्या पाठक सभागृहाच्या भाडेदरात 1 जुलै 2026 पासून सुधारणा केली आहे. नव्या दररचनेनुसार विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र शुल्क निश्चित करण्यात आले असून, या निर्णयामुळे साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

नवीन दरांनुसार व्याख्याने, पुस्तक प्रकाशन समारंभ, चर्चासत्रे आणि साहित्यिक कार्यक्रमांसाठी सोमवार ते शुक्रवार 2,500 रुपये, तर शनिवार आणि रविवारी 3,000 रुपये भाडे आकारले जाणार आहे. याशिवाय संगीत मैफिली, कराओके व तत्सम सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तीन तासांचे भाडे 10 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.

नगरवाचनालयाच्या प्रशासनाने सभागृहाची देखभाल, वाढता देखभाल खर्च आणि उपलब्ध सुविधांचा विचार करून ही दरवाढ करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नव्या दरांचा परिणाम लहान संस्था, वाचन मंडळे, सामाजिक संघटना आणि स्वतंत्र आयोजकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी या दरांचा फेरविचार करण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, भविष्यात व्यवस्थापनाकडून याबाबत अधिक स्पष्टीकरण दिले जाईल का, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

नवे भाडेदर

व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, साहित्यिक कार्यक्रम (सोमवार ते शुक्रवार) : 2,500

व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, साहित्यिक कार्यक्रम (शनिवार व रविवार) : 3,000

संगीत मैफिली, कराओके व तत्सम कार्यक्रम (3 तास) : 10,000


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माहिती अधिकार अपीलाची सुनावणी रद्द; जिल्हा परिषदेत संबंधित अधिकारी अनुपस्थित; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

संबंधित बातम्या