सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर ग्रामपंचायतींमधून नगरपरिषदेत समाविष्ट होणार्या कर्मचार्यांच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यात हद्दवाढ क्षेत्रातील सात कर्मचार्यांच्या समावेशनास मंजुरी देण्यात आली. सातारा नगरपरिषदेने समावेशनाचे आदेश पारित केले असून, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संबंधित कर्मचार्यांना आदेशांचे वितरण करण्यात आले.
या पहिल्या टप्प्यात शाहूपुरी, खेड, दरे खुर्द आणि विलासपूर येथील श्री. दशरथ पिसे, श्री. सुधीर कदम, श्री. राहुल खंडागळे, श्री. मनोहर अहिरेकर, सौ. वैशाली कोकरे, श्री. अनिल शिंदे आणि सौ. पूनम माने यांचा नगरपरिषद सेवेत समावेश करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष ड. डी. जी. बनकर, नगरसेवक अक्षय जाधव, आस्थापना प्रमुख श्रीमती शिंगाडे तसेच चेतन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हद्दवाढीनंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचार्यांच्या समावेशन प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचार्यांचा सेवाविषयक मार्ग मोकळा झाला असून, हद्दवाढ क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार आहे.