सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील दोन महत्वाच्या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेतला. बैठकीत लिंब ता. सातारा गयेथील कातकरी वस्तीला जोडणार्या रस्त्याच्या बांधकामासाठी धोम उजव्या कालव्यालगत आवश्यक परवानगी देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर, जावली तालुक्यातील हातगेघर येथील शेतजमिनीच्या सिंचनासाठी उपसा सिंचन योजनेला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
लिंब येथील कातकरी वस्ती रस्ता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेअंतर्गत मंजूर असून, पद्मावती मंदिर ते कातकरी वस्ती असा प्रस्तावित आहे. संबंधित जागेची तांत्रिक पाहणी व उपलब्ध जागेचा अभ्यास केल्यानंतर कालव्यालगत रस्ता बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे कातकरी समाजाच्या वस्तीला सुरक्षित व कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीत जावली तालुक्यातील हातगेघर येथील वंचित शेतजमिनींना सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रस्तावित उपसा सिंचन योजनेलाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
हातगेघर गावातील सुमारे 227 हेक्टर क्षेत्र अद्याप सिंचनापासून वंचित आहे. कुडाळी प्रकल्पातील बंदिस्त नलिका प्रणालीमुळे होणार्या पाण्याच्या बचतीचा उपयोग करून या अतिरिक्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ देणे शक्य असल्याचे तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. त्यानुसार शासनस्तरावरील आवश्यक मान्यता देण्यात आली असून पुढील सर्वेक्षण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, आदिवासी वस्तींसाठी मूलभूत सुविधा आणि शेतकर्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांना प्राधान्य देत संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
या बैठकीमुळे सातारा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना दळणवळणाची सुविधा मिळण्यास तसेच हातगेघर परिसरातील शेतकर्यांना सिंचनाचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.