सातारा : शेतकरी हा आपल्या देशाच्या प्रगतीचा मुख्य पाया असून देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. बदलत्या काळात आता सेंद्रिय शेतीला आणि सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि आपले उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी कृषी सभापती लता कर्णे, महिला व बाल कल्याण सभापती ऋतुजा शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांच्यासह विशेष समित्यांचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे जनक आहेत, असे सांगून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. शिंदे म्हणाल्या, कै. वसंतराव नाईक यांनी कृषी विद्यापीठांची स्थापना केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. त्याचबरोबर अनेक धरणांची उभारणी करून महाराष्ट्रातील शेतीसाठी सिंचन क्षमता वाढविली. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे व पर्यायाने कृषी उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी व जमिनीतील जैविक क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज बनली आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसमृद्धी अभियानांतर्गत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून पाणी अडविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचाही लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्याचे संरक्षण करणे आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे कृषी सभापती श्रीमती कर्णे यांनी सांगितले.
डॉ. जे.के. बसू सेंद्रिय शेती पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन व कै. यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.