'कोयने'च्या गाळात आढळली ‘ढोकरा’ शैलीतील गणेशमूर्ती; इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाने यंदा तळ गाठल्यामुळे विस्थापित झालेली गावे, जुनी मंदिरे आणि घरांचे अवशेष पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. याचदरम्यान धरणाच्या गाळात ‘ढोकरा’ शैलीतील एक दुर्मीळ आणि देखणी गणेशमूर्ती आढळून आली आहे. ऋषी मुद्रेतील बैठ्या आसनातील ब्रांझ धातूची ही मूर्ती सध्या इतिहासप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय ठरली आहे.

कोयना धरणाच्या निर्मितीसाठी १९५८ मध्ये संपादन प्रक्रिया सुरू झाली होती, जी १९६१ साली पूर्ण झाली. त्यानंतर १९६३ मध्ये धरणाचे काम पूर्णत्वास आले. या धरणामुळे जावळी, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील सुमारे १०५ गावांचे विस्थापन झाले. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय आटला आणि हे विस्थापित वैभव समोर आले.

बामणोली भागात आढळलेली ही मूर्ती मंदिर अथवा घराच्या परिसरात नव्हेतर, गाळाच्या मातीत सापडली आहे. त्यामुळे कोयनेच्या प्राचीन सांस्कृतिक वारशावर नवा प्रकाश पडला असून, पुरातत्त्वीय निकषानुसार याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

काय आहे ढोकरा शैली?

ढोकरा ही एक जुनी, वर्षानुवर्षे चालत आलेली धातू ओतकामाची पारंपरिक कला आहे. या शैलीत मेणाचा साचा वापरून धातूपासून मूर्तीची निर्मिती केली जाते. या कलेमध्ये मूर्ती आधी हाताने मेणापासून तयार केली जाते, त्यावर मातीचा लेप देऊन ती भाजली जाते आणि मेण वितळवून त्या जागी वितळलेला धातू ओतून मूर्ती घडविली जाते.

या मूर्तीची प्रमुख वैशिष्ट्ये

या गणेशमूर्तीवर कलेची छाप असून, तिचे नक्षीकाम अत्यंत आखीवरेखीव आणि सुबक आहे. अनेक वर्षे पाण्याच्या आणि गाळाच्या खाली राहूनही ही मूर्ती आजही पूर्णपणे सुस्थितीत आणि सुरक्षित आहे. मुख्याने छत्तीसगड, बिस्तर या भागात आदिवासी कला म्हणून या पद्धतीचे मूर्ती काम प्रसिद्ध आहे. कोयनेच्या पात्रातील सापडलेली मूर्ती खरोखर प्राचीन असेल तर महाराष्ट्रातही असे काम होत असेल का? यावर संशोधन व्हायला हवे.

- नीलेश पंडित, कार्याध्यक्ष, जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर; नवजाला ८६ मिलिमीटरची नोंद, कोयनेत २५५६ क्युसेक आवक
पुढील बातमी
पारंपारिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी - डॉ. प्रिया शिंदे, कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा

संबंधित बातम्या