सातारा : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्रतापसिंह शेती फार्म परिसरातील जागा, इमारती, झाडे आणि इतर साहित्य सुरक्षित राहावे यासाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही सभेत भर देण्यात आला.
सभापती सौ. लता कर्णे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कृषी समितीची सभा पार पडली. यावेळी समिती सदस्यांसह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रतापसिंह शेती फार्मकडे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याने परिसरात गैरप्रकार वाढत असल्याची बाब सदस्यांनी सभेत निदर्शनास आणून दिली. जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा, इमारती तसेच मौल्यवान झाडे आणि साहित्य या ठिकाणी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
याशिवाय जिल्हा परिषद सेसमधून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी आभार मानले. दरम्यान, पशुसंवर्धन समितीची सभाही सौ. लता कर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.