सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लवकरच सातारा जिल्ह्यात दाखल होत असून, चार मुक्काम राहाणार आहेत. यासाठी लाखो वारकरी आणि भाविक दाखल होणार आहेत. या सर्वांच्या सेवेसाठी विविध विभागांचे सुमारे एक हजार अधिकारी आणि कर्मचारी वारकऱ्यांना सेवा देणार आहेत. तसेच १००हून अधिक आरोग्य पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. जर्मन हँगरमध्येही वैद्यकीय आणि फूट मसाज पथके असणार आहेत, तर पिण्याच्या पाण्यासाठी ६६७ टँकर राहाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरला आषाढी एकादशीला जाण्यासाठी निघतो. हा सोहळा सातारा जिल्ह्यातूनही जातो. यावर्षी दि. १५ जुलै रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. या सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम असणार आहेत. त्यामुळे लाखो भाविक येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. आरोग्य विभागही सज्ज झाला आहे.
वारकऱ्यांसाठी पालखी तळावर ४ आरोग्य पथके, ४ आयसीयू पथके, ४६ वैद्यकीय फिरते पथक, १७ तात्पुरते दवाखाने कार्यरत राहणार आहेत. रुग्णवाहिकेची १२ पथके, जर्मन तंबूवर ७ मदत आणि ७ मसाज पथके कार्यरत राहणार आहेत. याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाकडून मेडिसीन ऑन व्हील अशी ३ पथके कार्यरत असणार आहेत. पाडेगाव ते बरड पालखी मार्गावर लहान, मोठ्या हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी तसेच हॉटेल कामगारांची वैद्यकीय तपासणी झाली आहे का नाही याची माहिती घेण्यासाठी ३ सनियंत्रण पथकेही कार्यरत राहाणार आहेत.
वारकऱ्यांना शुद्ध पाणी...
पालखी सोहळ्यात वारकरी, भाविक आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी खंडाळा तालुक्यात ५, फलटण तालुक्यात २९ अशी मिळून ३४ पाणी शुद्धीकरण पथके तैनात करण्यात येणार आहेत. पाणी टँकर भरण्यासाठी खंडाळा तालुक्यात १६ आणि फलटण तालुक्यात ४६ असे मिळून ६२ ठिकाणी टँकर फिलिंग पॉइंट पथके स्थापन केली आहेत. पालखी मार्गावर सार्वजनिक विहिरी ७, बोअरवेल ७४, खासगी विहिरी ३१५, नळ योजना ३१५ अशा ४५० ठिकाणी पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. शासकीय ३२, खासगी ५७ आणि दिंडी सोहळ्यातील ५७८ असे मिळून ६६७ टँकर पाणीपुरवठ्यासाठी सज्ज राहाणार आहेत. या सर्व टँकरमध्ये ६२ फिलिंग पाॅइंटवर पाणी भरण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २४ तास नियंत्रण कक्ष...
पालखी सोहळ्यात भाविक आणि वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये. शासकीय मदत वेळेत मिळण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद, फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली आहे.