नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करावे- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; सातारा शहरातील विविध विकासकामांची पाहणी, बैलगाडीचा कासरा हातात घेत केले सारथ्य

by Team Satara Today | published on : 30 June 2026


सातारा : सातारा शहराच्या विस्तारवाढीनुसार त्या-त्या भागात आवश्यक असणारी विकासकामे मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सातारा पालिका प्रशासनाने प्राधान्य द्यावे. नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी यांनी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.

शाहूपुरी रांगोळी कॉलनी येथील जलतरण तलावाचे काम, चार भिंती परिसर, शाहूनगर मंगळाई कॉलनी येथील पाण्याच्या टाकीची मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी शाहूपुरी येथील पवार कॉलनी येथील नियोजित वाचनालय व अभ्यासिकेच्या इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, बांधकाम सभापती विनोद खंदारे, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरिगोसावी, गटनेते अविनाश कदम, नगरसेवक अक्षय जाधव, राजू गोरे, विश्वतेज बालगुडे, सचिन पाटोळे, रविराज किर्दत, फिरोज पठाण, दिलीप म्हेत्रे, विनोद मोरे, सुशांत महाजन, रवि पवार, नगरसेविका हेमलता भोसले मुख्याधिकारी विनोद जळक आदी उपस्थित होते.

सातारा शहराचा विस्तार वाढला असून, अनेक ठिकाणी ३० ते ३५ वर्ष जुन्या पाइपलाइन असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. त्या-त्या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. तसेच नवीन पाणीसाठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ज्या टाक्यांची कामे पूर्ण झाली असतील त्या टाकीतून पाणी वितरण सुरू करा, नागरिकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, अशा सक्त सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केल्या.

विकासकामांच्या उद्घाटनासाठी असो किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे कायमच आपल्या खासगी वाहनानेच येतात. मात्र, शाहूपुरी येथील एका विकासकामाच्या उद्घाटनावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर त्यांनी बैलगाडीचा कासरा हातात घेत तिचे सारथ्यही केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितही भारावून गेले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; क्यू आर कोड वर व्हिडीओद्वारे सुधारित माहिती उपलब्ध
पुढील बातमी
माउलींच्या स्वागतासाठी सातारा सज्ज; १००० अधिकारी-कर्मचारी देणार सेवा; जर्मन हँगरमध्येही वैद्यकीय आणि फूट मसाज पथके

संबंधित बातम्या