पोवई नाका परिसरात शाळा-महाविद्यालयांजवळच नियमांची पायमल्ली; खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा सुळसुळाट

by Team Satara Today | published on : 30 June 2026


​सातारा : शाळा आणि महाविद्यालयीन परिसराच्या १०० मीटर अंतरामध्ये खाद्यपदार्थ विक्री करण्यास शासनाचे कडक निर्बंध असतानाही, सातारा शहरातील पोवई नाका परिसरात या नियमांना हरताळ फासला गेल्याचे चित्र समोर आले आहे. येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालय व महाविद्यालय तसेच भिमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या अगदी पन्नास मीटर परिसरातील फूटपाथवरच हे खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासन ढिम्मपणे पाहत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​शासकीय नियमांनुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कोणत्याही खाद्यपदार्थांच्या विक्रीला मनाई करण्यात आली आहे. मात्र, नाका परिसरातील मुख्य फूटपाथवरच या अनधिकृत विक्रेत्यांनी चक्क बस्तान मांडले आहे. यामुळे एका बाजूला पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही, तर दुसऱ्या बाजूला महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि शाळकरी मुलींची या परिसरात मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण त्यासोबतच रोडरोमिओंचा त्रास आणि आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

​सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे वाहतूक शाखा आणि पालिकेचा आरोग्य विभाग या दोन्ही यंत्रणांच्या डोळ्यादेखत हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या बेकायदेशीर स्टॉल्सवर कोणतीही कारवाई होत नसल्याने, संबंधित विभाग या विक्रेत्यांना पाठीशी घालत आहेत की त्यांना मूक संमती देत आहेत, असा संशयास्पद प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शैक्षणिक वातावरण खराब करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस तात्काळ कारवाई करून हे स्टॉल हटवणार का, याकडे आता सातारकरांचे लक्ष लागले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस असल्याचे सांगून खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यात दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; क्यू आर कोड वर व्हिडीओद्वारे सुधारित माहिती उपलब्ध

संबंधित बातम्या