सातारा : माण तालुक्यातील म्हसवड येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या वडार समाजाच्या कुटुंबांवरील कारवाईविरोधात मी वडार महाराष्ट्राचा संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनात, नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना किंवा पर्यायी व्यवस्था न देता झोपड्या हटवून अनेक कुटुंबांना बेघर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, म्हसवड येथील वडार समाजातील अनेक कुटुंबे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्याकडे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच इतर रहिवासी पुरावे उपलब्ध आहेत. असे असतानाही कोणतीही बाजू ऐकून न घेता त्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलीला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला असून, संबंधित पोलिस कर्मचार्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एका बाळंतिणी महिलेसह वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर काढल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून निवार्याअभावी अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे राहत असलेल्या वडार समाजाच्या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल पिसाळ यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.