सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयनेत १४.२४ टीएमसी पाणीसाठा, खरीप पेरण्यांना गती

नवजा येथे ८६, कोयनानगरला ७७ आणि महाबळेश्वरमध्ये ६२ मिलिमीटर पावसाची नोंद

by Team Satara Today | published on : 30 June 2026


​सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून गेल्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू झाल्याने धरणात २ हजार ५५६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. यामुळे कोयनेचा पाणीसाठा वाढून १४.२४ टीएमसीवर पोहोचला असून, जिल्ह्यातील इतर भागांतही पावसाने हजेरी लावल्यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांच्या कामाला आता वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, नवजा आणि कोयना खोऱ्यात धुवाधार पाऊस झाला. पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथे तर विक्रमी पावसाची नोंद झाली होती. सातारा शहरासह पूर्व भागातही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेती क्षेत्राला गती मिळण्याचे संकेत मिळाले होते. मात्र, त्यानंतर सलग तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने केवळ ढगाळ वातावरण निर्माण होत होते आणि सातारा शहरातही पावसाची विश्रांती राहिली होती. अखेर रविवारी सायंकाळपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागांत समाधानकारक पाऊस पडत आहे.

​पश्चिम भागातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि धरण क्षेत्रात रविवारी दुपारपर्यंत पावसाने ओढ दिली होती, मात्र सायंकाळनंतर सुरू झालेल्या एकसारख्या पावसामुळे ओढे-नाले पुन्हा प्रवाही झाले आहेत. भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव आणि माण तालुक्यांच्या काही भागांतही दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप हंगाम पेरणीच्या कामांना गती येणार असून ग्रामीण भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

​यंदा जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याची नोंद असून, आगामी जुलै महिन्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे अजूनही तळाला असल्यामुळे वर्षभराच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे.

नवजा येथे सर्वाधिक ३१४ मिलिमीटर पावसाची नोंद 

​सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला असून, नवजा येथे ८६, कोयनानगरला ७७ आणि महाबळेश्वरमध्ये ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासूनच्या एकूण पावसाचा विचार करता नवजा येथे सर्वाधिक ३१४ मिलिमीटर, महाबळेश्वरमध्ये २७४ मिलिमीटर आणि कोयनेत २२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक सुधारली असून, जिल्ह्यातील इतरही लघु आणि मध्यम धरण क्षेत्रांत संथ गतीने पाणी पातळी वाढू लागली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पवारवाडीचे सुपुत्र जवान तुषार भिलारे यांचा अपघातात मृत्यू; आज (बुधवारी) होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुढील बातमी
सुरक्षित, स्वच्छ व सुखकर वारी हेच आमचे ध्येय; वारकर्‍यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज - डॉ. प्रिया शिंदे; पालखी मार्ग पाहणी दौरा व आढावा बैठक

संबंधित बातम्या