सातारा : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात 'एचएसआरपी' (HSRP) नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत आज, ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या, १ जुलैपासून नियम धुडकावणाऱ्या वाहनधारकांवर थेट आणि कडक दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले असून, सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी आता केवळ काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरून ही धडक मोहीम राबवणार आहे. मुदत संपल्यानंतर केवळ दंडात्मक कारवाईवरच परिवहन विभाग थांबणार नसून, एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओ कार्यालयातील अनेक महत्त्वाची कामेही रोखली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या प्रशासकीय सेवांचा समावेश आहे. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाला या कारवाईतून तूर्तास वगळण्यात आले असून, ज्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृतपणे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांनाही या कारवाईतून तात्पुरता दिलासा मिळणार आहे.
या मोहिमेसाठी राज्य सरकारने अधिकृत दर निश्चित केले असून, त्यानुसार जीएसटी वगळून व फिटमेंट शुल्कासह दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारले जात आहे. संपूर्ण राज्यात एचएसआरपी बसविण्याच्या कामासाठी तीन स्वतंत्र झोन करण्यात आले असून, त्यानुसार रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहनधारकांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने यासाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे. कोणताही आर्थिक दंड किंवा आरटीओ कार्यालयातील कामांचा खोळंबा टाळण्यासाठी वाहनधारकांनी तत्काळ आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.