सातारा : जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्फोटक पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करणार्यांविरोधात सातारा पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर आणि वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात जिलेटीन कांड्या, डिटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट यांसारखा घातक स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली कारवाई 25 जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिंडवाडी येथील दगडी खाणीत करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेथे छापा टाकला. बीडीडीएस आणि फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने संपूर्ण परिसर निर्मनुष्य करून लोखंडी कंटेनरची तपासणी केली असता, त्यामधून 480 किलो अमोनियम नायट्रेट, 2423 जिलेटीन कांड्या आणि 1890 डिटोनेटर असा एकूण 1 लाख 54 हजार 285 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी घटनास्थळावरून संशयित आरोपी शिवराज बलदेव चौधरी (वय 50, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 29 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासात विशाल जाट, बाबूलाल जाट आणि शंकर बेनीराम चौधरी (सर्व रा. मायणी, जि. सातारा) यांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे.
याच गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल जाट आणि बाबूलाल जाट हे टाटा व्हॅन आणि दोन पांढर्या रंगाच्या बोलेरो गाड्यांमधून मायणी परिसरातील गरवारे वस्ती येथे स्फोटक पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन संशयीत वाहनांची झडती घेतली. या वाहनांमधून खाकी रंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या 1800 जिलेटीन कांड्या, इलेक्ट्रिक, नॉन-इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डिटोनेटर, कॉर्टेक्स आणि सेफ्टी फ्युज असा एकूण 17 लाख 9 हजार 900 रुपये किंमतीचा प्रचंड साठा हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत आरोपी विशाल जाट आणि बाबूलाल जाट यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला अन्य एक आरोपी शंकर बेनीराम चौधरी याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये सातारा शहर आणि वडूज पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या विविध कलमांसह संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा दोन्ही गुन्ह्यांमध्ये परस्पर सहभाग निष्पन्न झाल्याने पोलीस त्यांचा ताबा घेऊन पुढील सखोल तपास करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी करणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, एलसीबीचे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, निलेश तांबे, घनश्याम सोनवणे तसेच डी.बी. पथक, बीडीडीएस आणि फॉरेन्सिक युनिटच्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.