शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथे अमली पदार्थ (एमडी) मेफेड्रॉन विक्री करण्याकरता आलेल्या एका युवकाला बसस्थानक परिसरातून शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताकडून १५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली आहे. अवघ्या १५ दिवसांच्या फरकाने खंडाळा तालुक्यात दुसरी ड्रग्जची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
मंदार मंगेश शहाणे (वय २१, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे अटक केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील एस.टी.बसस्थानकात संशयित मंदार हा एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती पोनि यशवंत नलावडे यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला. यावेळी एस.टी. बसस्थानकात मंदार शहाणे हा एम.डी. ड्रग्ज विक्री करण्याकरता विकत घेणाऱ्याची वाट पाहत असल्याचे आढळून आले. त्याला पोलिसांची चाहूल लागताच बसस्थानकातून बुलेटवरून पलायन करत असताना पोलिसांनी १ कि.मी. पाठलाग करून मंदारच्या मुसक्या आवळल्या. त्याची झाडाझडती घेतली असता १५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली आहे. यानंतर डीवायएसपी धन्यकुमार गोडसे व एलसीबीच्या पथकाने भेट देत पाहणी केली.
ही कारवाई सपोनि महादेव शिद, कीर्ती म्हस्के, पोलिस अंमलदार सचिन वीर, नितीन नलावडे, अरविंद बाऱ्हाळे, सूरज चव्हाण, अजित बोऱ्हाटे, भाऊसाहेब दिघे, तुषार अभंग, संजय केंगले, संपत कांबळे, संतोष इंगवले यांच्या पथकाने केली.