समस्या सोडवा, कामात दिरंगाई चालणार नाही - ना. शिवेंद्रसिंहराजेंची अधिकाऱ्यांना आक्रमक तंबी, सातारा शहरातील विकासकामांची पाहणी

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : सातारा शहरातील विकासकामांच्या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाला नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. "नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करून प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरी रांगोळी कॉलनी येथील जलतरण तलाव, चारभिंती परिसर, शाहूनगर मंगळाई कॉलनीतील पाण्याची टाकी तसेच पवार कॉलनी येथे उभारण्यात येणाऱ्या ५० लाख रुपयांच्या वाचनालय व अभ्यासिका इमारतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.

शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक भागांमध्ये ३० ते ३५ वर्षे जुन्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आणून देत, ज्या ठिकाणी नवीन पाइपलाइन आणि पाणीसाठवण टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या तात्काळ कार्यान्वित करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

विकासकामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्राधान्याने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. विकासकामांचा दर्जा आणि गती याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश त्यांनी या पाहणीद्वारे दिला.

यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, विविध सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी विनोद जळक, नगर अभियंता विनोद दहिफळे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक; 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

संबंधित बातम्या