स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक; 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : महावितरणकडून घरगुती तसेच उद्योग-व्यावसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ 2 जुलै रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, सरकारने स्मार्ट मीटरची सक्ती तातडीने मागे घ्यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी ही माहिती दिली. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

राजकुमार पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील महावितरण कंपनीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांवर भविष्यात वाढीव वीजबिलांचा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता असून, स्मार्ट मीटर धोरण हे सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा भांडवलदारांच्या हिताचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांवर लादलेली स्मार्ट मीटरची सक्ती मागे घेतली नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने जिल्हाभर विविध टप्प्यांत आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

महावितरणच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात पक्षाने रणशिंग फुंकले असून, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर (भाऊ) घाटगे यांनी युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सातार्‍यातील राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, सुवर्णताई पाटील, नितीन शिंदे, प्रवीण धसके, अर्चना देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेटरला मारहाण करून त्रिमूर्ती बारचे नुकसान केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
समस्या सोडवा, कामात दिरंगाई चालणार नाही - ना. शिवेंद्रसिंहराजेंची अधिकाऱ्यांना आक्रमक तंबी, सातारा शहरातील विकासकामांची पाहणी

संबंधित बातम्या