मायणीत बेकायदेशीर स्फोटकांचा साठा जप्त; १७.०९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, तिघांवर गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

by Team Satara Today | published on : 27 June 2026


सातारा : स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि वडूज पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मायणी (ता. खटाव) येथे बेकायदेशीरपणे स्फोटकांचा साठा व विक्री करणाऱ्या रॅकेटवर धाड टाकून १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत विशाल लक्ष्मण जाट (वय ३९, सध्या रा. मायणी, ता. खटाव; मूळ रा. रायपूर, जि. भिलवाडा, राजस्थान), बारुलाल लक्ष्मण जाट (सध्या रा. मायणी, ता. खटाव; मूळ रा. राजस्थान) आणि शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी, ता. खटाव – मालक व पुरवठादार) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथक तयार केले होते. विश्वसनीय माहितीच्या आधारे मायणी-विटा मार्गावरील गरवारे वस्ती परिसरात दोन बुलेरो वाहनांमधून जिलेटिन व इतर स्फोटकांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

छाप्यात दोन बोलेरो वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये 'सुपर पॉवर 19 एक्स' असे नमूद असलेले स्फोटकांचे बॉक्स आढळून आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीएस) आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीएसने स्फोटके असल्याची खात्री केल्यानंतर अत्यंत सुरक्षित पद्धतीने स्फोटके जप्त करण्यात आली.

कारवाईत १,८०० जिलेटिन कांड्या (९ बॉक्स), इलेक्ट्रिक, नॉन-इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डेटोनेटर्स, सेफ्टी फ्युज, दोन बुलेरो वाहने आणि टाटा कंपनीचा बंदिस्त टेम्पो असा एकूण १७,०९,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानाधारक मॅगझिनमध्ये ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी स्फोटक पदार्थ अधिनियम, १८८४ मधील कलम ९(ब), स्फोटक पदार्थ अधिनियम, १९०८ मधील कलम ५ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८८ अन्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार अजित करणे, प्रवीण पवार, स्वप्निल दौंड, अमित सपकाळ तसेच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस अधिकारी शिंदे, पोलीस हवालदार चव्हाण, काळे व महिला पोलीस अंमलदार चव्हाण यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पथकाचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर एसटीच्या धडकेत कणसेवाडीचा युवक ठार; वडूज पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
सतर्क पोलिसांमुळे बालविवाह हाणून पाडला; रहिमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीला मिळाले कायद्याचे संरक्षण

संबंधित बातम्या