मोहरम बंदोबस्तात सातारा शहर पोलिसांची कारवाई; कत्तलीसाठी नेले जात असलेले गाईचे वासरू ताब्यात, ओम्नीसह मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा  :  मोहरम बंदोबस्तादरम्यान गस्त घालत असलेल्या सातारा शहर पोलिसांनी गुरुवार पेठ परिसरात कारवाई करून कत्तलीसाठी अवैधरित्या नेले जात असल्याचा संशय असलेले गाईचे वासरू ताब्यात घेतले. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ओम्नी कारही जप्त करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई संतोष घाडगे, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. राठोड व त्यांच्या पथकाला हितेन विजय केंडे आणि हर्षद दिलीप सुतार यांनी गुरुवार पेठ येथील इकबाल आदम शेख (वय ४५) हा ओम्नी कारमधून गाईचे वासरू आणत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधिताच्या घराजवळ सापळा रचला.

दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास एमएच-१२ एफपी-५३०३ क्रमांकाची ओम्नी कार तेथे आल्यानंतर चालक वासरू घरात नेत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत जनावराच्या वाहतुकीसाठी किंवा कत्तलीसाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध कागदपत्र अथवा परवाना त्याच्याकडे नसल्याचे समोर आले. तसेच वासरू कोठून आणले याबाबतही तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता जनावराच्या वाहतुकीसाठी आवश्यक चारा, पाणी व पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता सुमारे चार महिन्यांचे एच.एफ. क्रॉस जातीचे नर वासरू अशक्त असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी वासरासह अंदाजे दीड लाख रुपये किमतीची ओम्नी कार जप्त केली आहे. या प्रकरणी इकबाल आदम शेख याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील संबंधित कलमांनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खिंडवाडीतील खाणीत अवैध स्फोटकांचा साठा उघड; शहर पोलिसांची धडक कारवाई, राजस्थानातील एक जेरबंद
पुढील बातमी
सातारा जिल्हा रुग्णालयात ५० लाखांच्या रक्त घटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण; रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचा स्तुत्य उपक्रम;

संबंधित बातम्या