खिंडवाडीतील खाणीत अवैध स्फोटकांचा साठा उघड; शहर पोलिसांची धडक कारवाई, राजस्थानातील एक जेरबंद

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा : सातारा तालुक्यातील खिंडवाडी येथील दगड खाण परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यावर सातारा शहर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा स्फोटक साहित्याचा साठा जप्त करण्यात आला असून, राजस्थानातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना खिंडवाडी येथील खाण परिसरातील कंटेनरमध्ये अवैध स्फोटके लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी छापा टाकला. तेथे कुलूपबंद कंटेनरची पाहणी केली असता आत मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी परिसराची सुरक्षा व्यवस्था करून तेथे उपस्थित असलेल्या शिवराज बलदेव चौधरी (रा. जोधपूर, राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने कंटेनरमधून २,४२३ जिलेटीन कांड्या, १,८९० डिटोनेटर, ४८० किलो नायट्रेट पावडर तसेच इतर स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली. पुढील धोका टाळण्यासाठी हा साठा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला.

बेकायदेशीररीत्या स्फोटकांचा साठा करून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी शिवराज बलदेव चौधरी व त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सुधीर मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवाप्रवेशोत्तर परीक्षेसाठी जिल्हा परिषदेत प्रशिक्षण सुरू; ११४ कर्मचारी सहभागी
पुढील बातमी
मोहरम बंदोबस्तात सातारा शहर पोलिसांची कारवाई; कत्तलीसाठी नेले जात असलेले गाईचे वासरू ताब्यात, ओम्नीसह मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या