सातारा : पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत सातारा नगर परिषदेच्या वतीने मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेल्या तसेच नव्याने ₹१५ हजारांचे कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
हा मेळावा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सोनचिरया शहर उपजीविका केंद्र, राजवाडा, मोती तळ्याशेजारी, सातारा येथे होणार आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, नव्या कर्जासाठी अर्ज, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन यासाठी संबंधित अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
योजनेअंतर्गत यापूर्वी कर्ज घेतलेल्या पथविक्रेत्यांनी पुढील टप्प्यातील कर्जासाठी आवश्यक माहिती मिळविण्याची तसेच नव्याने ₹१५ हजारांचे कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेने नागरिक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित विभागांनी आपल्या परिसरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांपर्यंत या मेळाव्याची माहिती पोहोचवून त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा, असेही आवाहन केले आहे.