केबल चोरीचा गुन्हा आठ तासांत उघड; रहिमतपूर पोलिसांची धडक कारवाई, ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा :  रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साप येथील खडकी शिवारात आठ शेतकऱ्यांच्या विहिरी व कॅनॉलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल वायर चोरीचा गुन्हा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत उघडकीस आणत ५५ हजार ३०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २१ ते २२ जून २०२६ या कालावधीत मौजे साप येथील खडकी शिवारातील आठ शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल वायरची चोरी झाली होती. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१/२०२६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी आवश्यक असलेल्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या तांब्याच्या केबल वायर असा एकूण ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम, प्रविण बर्गे तसेच पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, राहुल मदने आणि रमेश बर्गे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई तालुक्यातील मोहडेकरवाडीत सख्‍ख्‍या लहान भावाचा खून
पुढील बातमी
लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार - पृथ्वीराज चव्हाण, महागाई, आरटीआय आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारवर घणाघात

संबंधित बातम्या