साताऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; वाहनांसह सराफा दुकानही फोडले, मोटारसायकल, दोन सायकलींसह ४५ हजारांच्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला

by Team Satara Today | published on : 25 June 2026


सातारा  : सातारा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गेल्या दोन दिवसांत वाहन चोरी आणि सराफा दुकान फोडल्याच्या स्वतंत्र घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका मोटारसायकलसह दोन सायकली लंपास केल्या असून देगाव रोड परिसरातील एका ज्वेलर्स दुकानातून चांदीच्या वस्तूंची चोरी केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.

समर्थ मंदिर परिसरातील प्रताप बंगला शेजारी उभी करण्यात आलेली होंडा शाईन कंपनीची ग्रे रंगाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सुमारे ६५ हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल वाहनमालकाने चावी लावलेल्या अवस्थेत उभी केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत गोडोली नाका येथील भंडारी प्लाझा अपार्टमेंट परिसरातून दोन सायकली चोरीस गेल्या. यामध्ये फायरफॉक्स फ्युजन कंपनीची सुमारे १० हजार रुपये किमतीची सायकल आणि नेको कंपनीची ५ हजार रुपये किमतीची सायकल असा एकूण १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी सुप्रिया अमर काटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास महिला पोलीस हवालदार देखने करीत आहेत.

दरम्यान, देगाव रोडवरील कदम कॉलनी येथील गोकुळ ज्वेलर्स या दुकानालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सुमारे २०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या गणपती मूर्ती, ताट-वाट्या, करंडे तसेच इतर चांदीच्या वस्तू आणि चांदीची मोड असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी राहुल पंढरीनाथ फडके यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात आरोपीविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार सुडके पुढील तपास करीत आहेत.

शहरातील मध्यवर्ती भागात सलग घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर वाहनचोर गजाआड; शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या यशस्वी कामगिरी
पुढील बातमी
खिंडवाडीत बेकायदा स्फोटकांचा साठा उघड; सातारा पोलिसांची धडक कारवाई. जिलेटीन, अमोनियम नायट्रेट आणि हजार डिटोनेटर जप्त

संबंधित बातम्या