७ लाखांची शस्त्रक्रिया आता मोफत; नव्या निर्णयामुळे श्रवणदोष असलेल्या मुलांना मोठा लाभ

by Team Satara Today | published on : 24 June 2026


मुंबई  : कर्णबधीर किंवा श्रवणदोष असलेल्या मुलांच्या कानात ऑपरेशनद्वारे कॉक्लिअर इम्प्लांट यंत्रणा बसवली जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दोन वर्षांपर्यंतच्या मुलांवर ही शस्त्रक्रिया मोफत होते. आता त्याची वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत वाढणार आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यावा?

अंगणवाडी, शासकीय शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या डॉक्टर पथकाकडून किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन बालकाची तपासणी करून घ्या. अर्जासोबत २.५ लाखांपेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, बालकाचे आणि पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि जन्म दाखला, वयाचा पुरावा जोडावा लागतो. त्यानंतर शासन मान्यता असलेल्या रुग्णालयात चाचण्या केल्या जातात. शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्यास मंजुरी मिळते. रुग्णालयाला मोफत कॉक्लिअर इम्प्लांट उपकरण पुरविले जाते आणि शस्त्रक्रियेची तारीख निश्चित केली जाते.

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी सात लाखांचा खर्च

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी बालकांची वयोमर्यादा २ वर्षांवरून ५ वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील पालकांना मुलाला ऐकण्याचा किंवा बोलण्याचा त्रास आहे हे समजायला अनेकदा उशीर होतो. २ वर्षाची मर्यादा असल्यामुळे निदानाला उशीर झालेल्या अनेक गरीब मुलांना मोफत शस्त्रक्रियेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. नव्या निर्णयामुळे गरजू बालकांना याचा लाभ मिळणार आहे. सात लाख रुपये खर्च येणारी ही शस्त्रक्रिया मोफत आहे.

कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे काय ?

कॉक्लिअर इम्प्लांट हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय उपकरण आहे, जे तीव्र किंवा अति-तीव्र कर्णबधिरता (बहिरेपणा) असलेल्या व्यक्तींना पुन्हा ऐकण्याची क्षमता मिळवून देण्यासाठी वापरले जाते. हे उपकरण सामान्य श्रवणयंत्रापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. श्रवणयंत्र फक्त बाहेरचा आवाज मोठा करते. याउलट, कॉक्लिअर इम्प्लांट कानाच्या खराब झालेल्या भागांना बायपास करून थेट श्रवण मज्जातंतूला विद्युत संकेतांद्वारे उत्तेजित करते.

बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दिली जाते मोफत सुविधा

केंद्र आणि राज्य शासनांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासारख्या प्रमुख शासकीय कार्यक्रमांनुसार पात्र बालकांना मोफत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया आणि संपूर्ण उपचार दिले जातात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोल्हापूर विभागातील नऊ शेतकऱ्यांना शासनाचे कृषी पुरस्कार; सातारा जिल्ह्यातील चौघांचा समावेश
पुढील बातमी
करंजेपेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये 'योगदिन' उत्साहात साजरा

संबंधित बातम्या